शिवनेरी ..... माझ्या नजरेतून

       महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आणि राजमाता जिजाऊ यांच्या संस्कार नि धन्य झालेला गिरीदुर्ग म्हणजेच शिवनेरी. गडावरील देवी शिवाईच्या नावातून साकार झालेलं नाव आज तमाम हिंदुस्थानी लोकांच्या हृदयावर राज्य करतंय ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. अश्या या शिवनेरीच्या मातीचा मस्तकी टिळा लावायला मिळतो हि एक भाग्यपूर्ण गोष्ट...
          छत्रपती ग्रुप तर्फे काढलेली पहिलीच मोहीम 'शिवनेरी मोहीम २०१७' भाग्यशाली इतिहासाच्या पाऊलखुणा जाणून घेण्याची एक सुवर्णसंधीच! मोहिमेला विविध ठिकाणाहून वरिष्ठ, विचारवंत, शिवभक्त, इतिहासकार याचेंबरोबर रविवार सुट्टीच्या दिवशी सुरवात झाली. आमची सुरवात पुणे येथून  सकाळी ७:३० वाजता सूर्यदेव दर्शनाच्या प्रथम भगव्या किरणाबरोबर झाली. संत ज्ञानोबामाउलींच्या आणि संत तुकाराम महाराजांच्या भक्तिमध्ये न्हाऊन गेलेल्या आळंदी, देहू मार्गे आम्ही चाकण हुन थेट नारायणगाव मध्ये पोहचलो. नारायणगाव मध्ये पोहचल्यावर शिवनेरी गड जवळच असल्याची चाहूल लागली. तिथून पुढे उंचच उंच डोंगराचे नजारे पाहत वाटचाल करत होतो. अचानक लक्ष काळ्याकुट्ट कपारीमध्ये असलेल्या कोरीव कामाकडे गेले. त्या होत्या प्राचीन बुद्ध लेण्या. या परिसरात लक्ष वेधून घेणाऱ्या लेण्या प्रचिन कलाकुसरीचे उत्तम उदाहरण. त्या मनमोहक लेण्या पाहता पाहता जुन्नरला कधी पोहचलो हे समजलेच नाही! जुन्नर मध्ये प्रवेश करताक्षणी शिवनेरी गडाचे दर्शन झाले. जुन्नर मध्ये छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन करून गडाकडे कूच केली.
किल्ले शिवनेरी
          शिवनेरी गिरीदुर्ग सहयाद्री पर्वताच्या नाणेघाट डोंगररांगा मध्ये साधारण समुद्रसपाटीपासून ३५००फूट उंचीवर स्थित आहे. सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकांचा नायनाट करून आपले वर्चस्व जुन्नर प्रांतावर प्रस्तापित केले. यावेळेसच या परिसरातील लेण्यांची निर्मिती त्यांनी केली. सातवाहनानंतर चालुक्य,राष्ट्रकुट आणि यादवांनी येथे आपले साम्राज्य पसरविले. आणि या काळातच शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. मलिक उल तुझर ने यादवांचा पराभव करून किल्ला हस्तगत केला. मलिक-उल -तुजारचा प्रतिनिधी मलिक महंमद याने किल्ला नाकेबंदी करून पुन्हा सर केला. मलिक महंमदच्या वडिलांच्या मृत्युनंतर निजामशाहीची स्थापना झाली. पुढे राजधानी गडावरून अहमदनगरला हलवण्यात आली. यानंतर १५९५ मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना शहाजीराजांनी त्यांना बाळंतपनासाठी शिवनेरी गडावर पाठविले. आणि याचवेळेस त्यांनी गडाला सात प्रवेशद्वारानी मजबूत केले.
‌         शिवनेरीच्या प्रथम पायरीपर्यंत गाडीने पोहचता येते. पायऱ्या चढायला सुरवात केली कि समोरच परकीय आक्रमण रोकणारा महादरवाजा आणि तटबंदी शिवनेरीच्या भक्कमतेची साक्ष देते. महादरवाजा पार केल्यानंतर डाव्या बाजूस प्रकाशाच्या विकिरणांमुळे निळाशार दिसणारा वडूज धरणाचा जलाशय लक्षवेधी आणि मनमोहक ठरतो. थोडं अंतर कपल्यानंतर पुढे गणेशदरवाजा आणि पिराचादरवाजा पाहवयास मिळतो. सरकारच्या प्रयत्नांमुळे ढासळलेले हे दोन दरवाजे आज नवीन रुपात पहावयास मिळतात.  थोद्या पायऱ्या चढल्या कि हत्ती दरवाजाचे दर्शन घडते. प्राचीन असलेला हा दरवाजा अजून मजबूत आहे थोडी याभोवतालच्या तटबंदीची पडझड झाली  असली तरी दरवाजा मजबूत आहे. तिथून पायऱ्या चढल्या कि मेणा दरवाजा आणि कुलूप दरवाजा जीर्ण अवस्थेत असलेला दिसतो. हे दोन दरवाजे पार केल्यांनंतर आपण गडावर जाऊन पोहोचतो.
‌        दरवाजातून वर गेल्यावर डाव्याबाजूला एक पडझड झालेली जीर्ण इमारत दिसते तोच अंबरखाना. येथे धान्य साठवण्याची व्यवस्था केली जाई. तिथून पुढे सापाटीने चालत जाताना ३ते४ पाण्याच्या टाक्या आढळतात येथील पाणी वापरात नसल्याने ते पिण्यायोग्य नाही. चालताना डाव्या बाजूला डोंगर दर्या आणि कपारींचा छान सा नजारा पाहण्यास मिळतो. तिथून पुढे गंगा आणि जमुना पाण्याचे टाके आढळते. इथे पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन दिसते. या टाक्यांकडे पाहल्यावर असे जाणवते 'आपल्या पूर्वजांनी पाण्याचे नियोजन किती योग्य प्रकारे केले आहे आणि आता आपल्या पिढीला अश्या नियोजन बद्धतेची गरज आहे'.
‌     तिथून पुढे गेल्यावर शिवकुंज नावाची १९६० ला महाराष्ट्र सरकार ने स्थापिलेली इमारत पहावयास मिळते, इथे राजमाता जिजाऊ सोबत बाल शिवाजी तलवार घेऊन आपली स्वप्ने सांगतानाचे बोलके शिल्प बसविण्यात आले आहे. तिथून पुढे गेल्यावर हमामखाना, कमानी मशीद आणि शिवजन्मस्थान पहावयास मिळते. हमामखाना आता पडजड झालेल्या अवस्थेत आहे. तिथून पुढे गेल्यावर शिवजन्मस्थान ची दुमजली इमारत सद्यस्तिथ आहे. महाराजांच्या बाल लिलांची साक्ष देणाऱ्या इमारतीत आम्ही नतमस्तक झालो यापेक्षा दुसर भाग्य कोणत? त्या दुमजली इमारतीत महाराजांचा पाळणा आणि अर्धाकृती पुतळा पहावयास मिळतो. तर वरच्या मजल्यावरुन जुन्नर, बदामी टाके पाहता येते याशिवाय गडावरील परिस्तितीचा आढावा घेणं हि सोयीस्कर पडत. शिवजन्म इमारतीत गेल्यावर मन शांत आणि डोकं थंड होत.
‌          तिथून निघाल्यावर भव्य असे बदामी टाके दिसते. तिथून थोडं खाली उतरून जाणारा रास्ता कडेलोट टोकाजवळ नेतो. पूर्वी याचा वापर गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे. कडेलोट टोकावरून लेण्यांद्रीचे लेण्या आणि लेण्यांद्री परिसर दृष्टिक्षेपात येतात. तीतून परत शिवकुंजाजवळ आल्यावर उंच टेकडी दिसते. ते अवघड चढण सर केल्यावर 'कोळी चौथरा' १५०० कोळ्यांनी मुघलांविरोधत बंड केल्याची साक्ष देतो. येथेच इतिहासात नोंद नसलेल्या आणि युद्धकला अवगत नसताना हि मुघलांना निकराची झुंज देणाऱ्या कोळ्यांच्या शिरांचे ढीग लावला होता. त्यावर उभा केलेला कोळी चौथरा! तिथून ईदगाह पासून पुढे गेल्यावर टेकडी उतरायला छोटीखानी वाट आहे, ती उतरली कि महाराष्ट्राचा नकाशा पाहवयास मिळतो.
‌            परत कुलूप दरवाजा आणि मेणा दरवाजा उतरला कि छोटी पायऱ्यांची वाट शिवाई दरवाज्याकडे घेऊन जाते. त्यातून आत गेल्यावर भव्य मंदिर दिसते तेच शिवाई देवीचे मंदिर! दर्शन घेऊन बाहेर आल्यावर सात ते आठ गुहा दिसतात त्या बुद्धकालीन लेण्या. देवी शिवाईचें दर्शन घेऊन आणि महाराजनचे विचार घेऊन आम्ही गड उतरण्यास सुरवात केली.
         आज शिवनेरी किल्ला सरकारच्या प्रयत्नांनी व्यवस्थित उभा आहे. आणि गडावरील सुशोभीकरण यामुळे त्याचे वैभव वाढले आहे. तरीही तो सरकारच्या मदतीच्या अपेक्षेत आहे.

इतिहास संशोधन
‌      आम्ही छत्रपती ग्रुप तर्फे शिवनेरी मोहिमेस गेलो. तिथे आमच्यातील सदस्यांनी गडाची माहिती दिली. विशेषता कोळी चौथरा आणि कोळ्यांचे शौर्य हे माझ्यासाठी नवीन माहिती होती.
‌         महादरवाज्यावर असणाऱ्या पाच पाय आणि शिंहाचे पक्षरूपी प्रतीक हे महाराजांनी पाच पातशाही पादाक्रांत केल्या हे दर्शविते. त्या पातशाहीं पैकी मुघलशाही ही उत्तरेकडील होती तर आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बरीदशाही पातशाह्या दक्षिणेकडील होत्या.

गड सफाई
‌        आम्ही छत्रपती समूहतर्फे इतिहास संशोधनाबरोबर गडकोट सफाई करण्यासाठी गेलो. सफाई करताना समाजाची विकृतीही दूर करण्याची गरज आढळली. विकृती म्हणजेच ऐतिहासिक वैभव असणाऱ्या वस्तूंवर कचरा करणे, दारू पिणे त्याच प्रमाणे प्रेमी युगुलांतर्फे विशिष्ट चिन्हांनी ऐतिहासिक वास्तू रंगीत करणे, तिच्यावर तोंडातील माव्याच्या पिचकाऱ्या मारणे इत्यादी. आता तसे समाज जागरूक होतोय, काही सेवाभावी संस्था समाज कार्याबरोबर गडसवर्धनाकडे वळल्या आहेत. पण हे भरपूर नाही आपण सर्वांनी मिळून हि जबाबदारी उचलली पाहिजे. पूर्वजांनी दिलेला अमूल्य ठेवा जपला पाहिजे. आम्हाला सफाई करताना बगून मदत जरी कोणी केली नसली तरी कचरा न करण्याची जाणीव सर्वाना झाली. काही वरीष्ठ शिवभक्तांनी यासाठी ग्रुपला सल्ला आणि आशीर्वाद दिलेत.

परतीचा प्रवास
‌           परतताना आम्ही मुंबईकडे निघालो. मेळघाट मार्गे साधारण ६:३० ला आम्ही निघालो. मावळतीच्या सूर्यच्या प्रवसाबरोबर आमचा प्रवास सुरु झाला. मेळघाटातील उंच डोंगर आणि शहारे आणणारे वळणदार रस्ते आणि कडे कपारी तसेच उंचच उंच झाडे पाहता पाहता अंधाराच्या सम्राज्यातून लखलखत्या गजबजाटात मुंबईत कधी प्रवेश केला हे समजलेच नाही.......

गणेश आनंदराव गोळे

‌संदर्भ:-
‌          गूगल मॅप
‌         अर्कालॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या पाट्या
‌         काही इंटरनेट वरील आणि ebook ची माहिती











Comments

  1. शिवनेरी किल्याची परिपूर्ण माहिती.
    Pic अजून पाठवा

    ReplyDelete
  2. खुप छान..माहिती....

    ReplyDelete
  3. मस्त गणेश छान सुरुवात केलीय.

    ReplyDelete

Post a Comment