वाईचा पाठीराखा: पांडवगड

वाईच्या वायव्येस (वाई ता. १७' ५५' उ., ७३' ५०" पू. उंची १,२७३ मीटर) ६ कि. मी. अंतरावर  वर आपल्या बलाढ्य नैसर्गिक रचनेने लक्ष वेधून घेतो तो विराटनगरीचा पाठीराखा पांडवगड! चौरस माथा असलेला या गडाच्या सौन्दर्यावर मोहून इकडे पावले ओढ घेत असतात. या गडाला पांडुगड असेही बोलले जाते.


इतिहास
कोल्हापूरचे शिलाहार राजा दुसरा भोज याने सातारा जिल्यात जे काही दुर्ग निर्माण केले त्यापैकी पांडवगड हा एक! याची निर्मिती ११७८ ते ११९३ या कालखंडात केली असावी. [सातारा गॅझेटिअर, १८८५, पृ. ५३५.]
स्थानिक लोकांच्या मते पांडव अज्ञातवासात असताना इथे राहिले होते आणि त्यावरूनच याचे नाव पांडवगड पडले.  परंतु याला इतिहास-संशोधकांची मान्यता नाही, कारण पांडव या भागात आलेलेच नव्हते. 'वाई ही महाभारत काळात विराटनगरी होती व पांडव अज्ञातवासात इथे पांडवगडावर राहिले'  समजूतीला इतिहास तज्ञांना कोणताही पुरावा मिळालेला नाही.
सन १६४८ मध्ये हा वाईच्या विजापूर दरबारच्या मोकासदाराच्या ताब्यात होता. 
१२ ऑक्टोबर १६७३ रोजी व पांडवगड किल्ल्यावर मराठा फौजेने हल्ला चढवला. आणि १३ ऑक्टोबर रोजी मराठ्यांनी पांडवगड जिंकला याबदल्यात बाळाजी आवजींचा सातारा येथे पालखी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी गौरव केला.
 सन १७०१ मध्ये औरंगजेबाने चंदन-वंदन बरोबर हा किल्लाही घेतला. अल्पकालावधीतच तो मराठ्यांनी परत घेतला.
सन १७११ मध्ये उंब्रजजवळ एका हरणावरून बाळाजी विश्‍वनाथ व सेनापती चंद्रसेन जाधव यांच्यात तंटा निर्माण झाला. चंद्रसेन जाधवाने बाळाजी विठवनाथाच्या पाठलागावर फौज रवाना केली. त्यावेळी बाळाजी विश्वनाथ पुरंदर किल्ल्यावरील सचिवाच्या आश्रयास गेला. परंतु तेथे त्यास आश्रय मिळाला नाही. त्यानंतर बाळाजीची व चंद्रसेन जाधवाची निरा येथे लढाई होऊन त्यात बाळाजीचा पराभव झाला. त्यानंतर त्यास पिलाजी जाधव व धुमाळ या ज्िलेदारांनी पांडवगडावर सुरक्षित पोहचविले. तेथून बाळाजी शाहूच्या आश्रयास साताऱ्याला गेला. चंद्रसेन जाधवाने बाळाजीस आपल्या ताब्यात द्यावे असे शाहूस कळविले. परंतु त्यास शाहूने नकार दिला व चंद्रसेन जाधवावर हैबतराव निंबाळकरास हल्ला करण्यास सांगितले. हैबतराव निंबाळकर व चंद्रसेन जाधवाची गाठ आदर्की घाटाखाली देऊर येथे पडली व लढाई झाली. यात जाधवाचा पराभव होऊन तो रहिमतपूर मार्गे पन्हाळ्यास निघून गेला व ताराबाईस मिळाला. [सरदेसाई, पूर्वोक्त, खंड ३, १९८९, पृ. ७६-७७.]
सन १८१७ मध्ये हा किल्ला साताऱ्याच्या छत्रपतीकडून दुसऱ्या बाजीराव पेशव्यातर्फे त्रिंबकजी डेंगळ्याने जिंकला. एप्रिल १८१८ मध्ये तो ब्रिटिशांनी जिंकला.

चढाईस सुरवात
या पांडवगडाकडे जाण्यासाठी तीन वाटा आहेत. एक म्हणजे वाईजवळच्या मेणवली गावातून, तर दुसरी धावडी गावाच्या हद्दीतून. आणि तिसरी वाट शेलरवाडीतून आहे. शेलरवाडीतून येणारी आणि मेनवलीतून येणाऱ्या या दोन्हीही वाटा पांडवगडाच्या माध्यभागावरील पठारावर भैरवनाथ मंदिराजवळ एकत्र येतात.
मेनवलीतून गडावर जाताना ठिकठिकाणी दगडाला शेंदूर फसलेल्या विविध देवता आढळतात. यामध्ये सातीयेसरा, कोंडजाई, चेडे, म्हसोबा इत्यादी.

 शेलरवाडीतुन आपण आलोत तर डोंगराच्या पायथ्याशी सिद्धनाथाच्या मंदिरा पर्यंत आता वाट झाली आहे. आणि इथून पांडवगडावर जाण्यासाठी कमी चढण आहे.


वाईमधून मांढरदेवला जाण्यासाठी गाडी रस्ता आहे. या मार्गावर धावडी नावाचे गाव आहे. धावडीतून पांडवगडावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. यामार्गे गडावर जाणार असाल तर इथे कोरीव लेणी पाहायला मिळतात.

पठार
मेनवली मार्गे आलोत तर डोंगराच्या माध्यभागावर एक पठार आहे.  याच पठारावर  किल्ल्यावरील देवस्थानच्या कोळ्यांची वस्ती होती. सध्या इथे घरांचे आणि पडक्या वाड्यांचे अवशेष आहेत. इथे एक स्वच्छ पाण्याची विहीर आहे. विहिरीतील पाणी पिण्यायोग्य आहे. 








                              

याच वाटेने थोडं पुढं गेलं की आपल्याला श्री काळभैरवनाथाचे मंदिर लागते. लाकूड, वीट वाळू आणि पत्र्याचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार अलीकडच्या काळातील वाटतो. तर इथे असलेल्या मूर्ती, शिवपिंडी, थडगी खूप पुरातन वाटतात.  






इथून पुढे अंदाजे १८३ मीटर उंचीचा अवघड चढाव आहे. ही चढाईची वाट गडावरील माचीवर घेऊन जाते.

माची उद्धवस्त देवड्या
गडाच्या अगदी माथ्याजवळ आलो की, काही पायऱ्यांचे अवशेष दिसतात. गडाचा पहिला धागा या पायऱ्यांमधूनच जुळतो. इथे माचीत शिरण्यापूर्वी एखादा दरवाजा असावा असे वाटते. पण सध्याच्या अवशेषांमुळे हा केवळ आपला अंदाज!

 या मार्गावर खडक फोडून त्यात ओबडधोबड पायऱ्या कोरलेल्या आहेत. त्या चढून गेल्यावर इथे खंदकात खोदलेल्या पाण्याच्या टाक्या, धान्याचे कोठार आढळतात. 

इथे एक नैसर्गिक गुहा पाहायला मिळते. इथूनच तांदळा प्रकारचे एक देवस्थान पाह्यला मिळते.

पाण्याची टाकी
गडाच्या खंदकाला वळसाघालत उत्तरेकडे जाताना पाण्याच्या टाक्या  आणि दोन तलाव  लागतात. एक तलाव व्यवस्थित फिरून पाहिल्यावर ते छोट्या धारणासारखे वाटते. खलील बाजून माती आणि दगडांमध्ये भिंत तयार केली आहे. गडावरून येणारे पाणी या धरणामध्ये येते. पाण्याचे उत्तम नियोजन पांडवगडावर आढळते. याच धरणाच्या बाजूला असणाऱ्या विविध आकाराच्या कोरीव पाण्याच्या टाक्या लक्ष वेधून घेतात.



गडशेजारील प्रायव्हेट प्रॉपर्टी
निसर्गारम्य माचीवर गवताबरोबर काही मोठाले वृक्षही दिसतात. यातीलच एकाच्या खोडाला पाटी लावलेली आहे, ‘प्रायव्हेट प्रॉपर्टी..परवानगीशिवाय प्रवेश करू नये’! शेर वाडिया नावाच्या एका पारशी गृहस्थाने या माचीवरीलच जमिनीचा एक तुकडा विकत घेतला आहे. इथेच त्याने स्वत:साठी एक बंगली थाटली असून त्यात तो गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून राहात आहे. तेथील चाकरीला असणारे लोक गड त्याच इसमाच्या ताब्यात आहे असे बोलतात. अगदी ते गडावर येणाऱ्या प्रत्येकाचा मोबाईल नंबर आणि अभिप्राय लिहून घेतात. ऐतिहासिक ठिकाणे कशी काय विकली जातात  संशोधनाचा विषयच आहे.
हे सर्व पाहून थोडं वर चढलं की महादरवाजा लागतो.

महादरवाजा आणि बुरुज
बालेकिल्ल्यात प्रवेश करताना  एक खणखणीत बुरुज, त्याला लागून कडय़ाला समांतर प्रवेशद्वाराची कमान आणि त्यालगत काही अंतरापर्यंत चिरेबंदी तट आहे.  दरवाजाची कमान ढासळलेली आहे. येथील  चिरेबंदी तटाची सरंक्षण दृष्टीकोनातून केलेली रचना पाहण्यासारखी आहे.अन्य बांधकाम आजही ताजे तवाने वाटते.  
पांडवगडाच्या चहुबाजूंनी असलेल्या सुमारे १३ ते १८ मीटर उंचीच्या कड्यामुळे किल्ल्यास नैसर्गिक तटबंदी लाभली आहे. त्यामुळे तटबंदीची आवश्यकता जिथे आहे तिथेच ती केलेली आढळते.


बालेकिल्ला
तटबंदीमधून एक वळण घेत आपण बालेकिल्ल्यावर येतो. किल्ला सामान्यपणे चौरसाकृती असून त्याचे क्षेत्रफळ अडीच हेक्‍टरचे आहे. इथे दोन पाण्याची टाकी असून ती कोरडी आहेत. वर पांडजाई देवीचे व मारुतीचे देऊळ असून काही इतर इमारतींचे अवशेषही आढळून येतात. 
किल्ल्यावरून पूर्वेकडे वाई, वायव्येला मांढरदेव डोंगररांग तर पश्‍चिमेला केंजळगड दिसतो. गडावरुन धोम धरणाचा जलाशय सुरेख दिसतो. जलाशयामागे कमलगडाचा माथा उंचावलेला दिसतो. त्यामागे महाबळेश्वराचे तसेच पाचगणीचे पठार ओळखू येते. पांडवगडाच्या माथ्यावरुन खाली वाई तसेच कृष्णा नदी ही दिसते. केंजळगड, मांढरदेव, चंदन वंदन किल्ले तसेच वैराटगड ही पहाता येतो.



 मारुती
तटबंदीतून वर येताच  मारुतीचे मंदिर येते. मारुतीची मूर्ती अनोखी आणि पाहण्यासारखी आहे. वीर भावातील या मारुतीच्या हातात कटय़ारीसारखे एक हत्यार दाखवले आहे.
      
मारुती मंदिर वीट आणि मातीतील बांधकामात आहे. त्यामागील तटबंधी ढासळलेली आहे. 
कपरितील देवतागडामध्ये हनुमंताचे मंदिर आहे. मंदिर बांधलेले नसल्यामुळे मुर्ती उघड्यावर आहे

चुन्याचा घाना
मारुती मंदिराच्याच पुढे गडावरील चुन्याची घाणा येतो. येथे दोन घाणे होते. काही नातधृस्ट मंडळींनी एका घाण्याची मोडतोड केली आहे. एक सुअवस्थेत असला तरी 'आम्ही मावळे' या अविर्भावात येणारी तरुण मुले त्यावर आपला बालप्रयोग करून ते चाक फिरवण्याचा प्रयत्न करतात. हे चालूच राहिले तर ते सुद्धा खराब होऊ शकते.

पांडजाई देवी मंदिर आणि शिवलिंग
गडावर गडाची देवी पांडवजाईचे मंदिर आहे. गावकर्‍यांचे कुलदैवत असल्यामुळे हा परिसर गावकर्‍यांनी स्वच्छ ठेवलेला आहे.  मूळ मंदिर पडून गेलेले आहे. पण त्याचे जोते अद्याप शिल्लक आहे.  जोत्यावर नव्याने बांधलेले मंदिराची सुद्धा दुरवस्था झालेली आहे. देवीची मूर्तीही झीजलेली आहे. पाण्यासाठीचे अनोखे असे  दगडी भांडे मंदिरासमोर पाहायला मिळते. 

     
मंदिरासमोर शिवलिंग, नंदी, पादुका, वीर पुरुषाची एक मूर्ती आदी शिल्प दिसतात. पांडजाई मंदिरामागे खूप पुरातन आशा मंदिराचे अवशेष आहेत. झाडांची मुळे आणि दुर्लक्षितपणामुळे खणखणीत घडण असलेली ही पुरातन मंदिरे विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. इथेही दुर्लक्ष झाल तर हे मंदिराचे ढाचे सुद्धा विलुप्त होऊ शकतात. कदाचित याच मंदिरात शिवलिंग असावे असे वाटते आणि याची पडझड झाल्यामुळे स्थानिकांनी हे मंदिरासमोर आणले असा आपण निष्कर्ष काढू शकतो.
          

          

उद्धवस्त वस्तू
पांडजाई मंदिरा शेजारी गडावरील एका मोठय़ा घराचे जोते आहे. गड माथ्यावर ठिकठिकाणी शिबंदीची घरे दिसतात. यापैकी काही दारुगोळय़ाची कोठारे, पागा, धान्यकोठारे असावीत. गडावर योग्य प्रकारे उत्खनन केले तर गडावरील वस्तू चे अवशेष आणि इतर वस्तू सापडू शकतात. 
    

दक्षिणेकडील कोरडे पडलेले तलाव, तटबंदी आदी पाहात आपण पुन्हा दरवाज्यापाशी येऊन पोहोचतो. 

निरोप
आम्ही समस्त गोळे परिवारातर्फे कडेकोट मोहिमे अंतर्गत गेलो होतो. इथे आम्ही साफसफाई, मंदिरामधील नतद्रष्ट मंडळीनी केलेली कोरीव कामे, गुटख्याच्या आणि तंबाखूच्या पिचकाऱ्या पुसायचे काम आम्ही केले. त्यासोबत जाणकार मंडळींनी इतिहासाचे मार्गदर्शन केले. आमचे आदरणीय अध्यक्ष, जेष्ठ कीर्तनकार, शिवव्यख्याते, ह भ प श्री हिंदुराव गोळे महाराज यांनी छत्रपतीं शिवराय आणि शंभूराजांचा इतिहास सांगितला. त्यानंतर आम्ही गडाचा निरोप घेतला.



©गणेश आनंदराव गोळे

Comments

Popular posts from this blog

किल्ले अजिंक्यतारा :- द्वारशिल्पे

अब्राहम लिंकन: फाळणी टाळणारा महापुरुष

शिवनेरी ..... माझ्या नजरेतून